
पाकिस्तानात महागाईने जनता बेहाल असताना राजकारणी नेते मात्र ऐशोआरामात जीवन जगत आहेत. स्वतःच्या ऐशोआरामासाठी सरकारी खजान्यातील पैसा पाण्यासारखा खर्च करत आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्यावर पुन्हा एकदा सरकारी पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला जात आहे. मरियम नवाज यांनी 1 हजार कोटी रुपये किमतीचे लक्झरी जेट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंजाब सरकारकडून हाय प्रोफाईल गल्फस्ट्रीम बिझनेस जेट खरेदी केल्याची चर्चा आहे. यावरून पाकिस्तानात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एका वर्तमानपत्रात या विमानासाठी प्रशिक्षित पायलट हवा आहे, अशी जाहिरात छापून आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या विमानाच्या खरेदीवरून आतापर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. गल्फस्ट्रीमच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार, हे विमान 19 लोकांना घेऊन जाण्यात सक्षम आहे. या विमानात साधे सीट नसून लक्झरी सोफे बसवण्यात आले आहेत. 8 लोकांना आराम करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हे विमान न थांबता 8300 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
मेकअपसाठी चार कोटी
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपसाठी सरकारने चार कोटी रुपयांचा फंड जारी केला होता. सरकारच्या या निर्णयावरून पाकिस्तानमध्ये एकच गदारोळ उडाला होता. तसेच मरियम नवाज यांच्या गाडीचे टायर बदलण्यासाठी एक कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले होते.




























































