पंतप्रधानांचा ताफा खोळंबल्याचे प्रकरण, पंजाबमधील पोलीस अधीक्षकाचे निलंबन

पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत अडवला होता. या आंदोलनामुळे पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे फ्लायओव्हरवर थांबून राहिला होता. या प्रकरणी पंजाब पोलीस महासंचालकांनी पोलीस अधीक्षक गुरबिंदर सिंग सांगा यांना निलंबित केलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी राहिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल 18 ऑक्टोबरला सरकारला सोपवण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी 5 जानेवारी 200 रोजी भटिंडाहून फिरोजपूरला रस्ते मार्गाने जात असताना शेतकऱ्यांनी या मार्गावर ट्रॅक्टर उभे करून महामार्ग बंद केला होता.र पीएम मोदींचा ताफा फिरोजपूरमधील प्यारे आणा फ्लायओव्हरवर 20 मिनिटे थांबला होता. त्यानंतरही रस्ता खुला न झाल्याने पंतप्रधानांचा ताफा माघारी परतला होता. पंतप्रधान मोदी भटिंडा येथील भिसियाना विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले की, ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांहा, मी जिवंत परतलो आहे.’ ही घटना झाली तेव्हा सांगा हे पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) म्हणून तैनात होते. यानंतर त्यांची भटिंडा येथे बदली झाली होती.

गृह आणि न्याय विभागाचे सचिव गुरकिरत कृपाल सिंग यांनी जारी केलेल्या आदेशानुसार एसपी सांगा यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्य कार्यालय हे पोलीस महासंचालकांचे चंदीगडमधील कार्यालय असेल, असे त्यांना कळवण्यात आले आहे. कार्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. एसपी सांगा सध्या भटिंडा येथे अधीक्षक म्हणून तैनात होते. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या तपास समितीच्या अहवालात पंजाबचे तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी आणि डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांना फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. समितीने आठ महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि सरकारला हा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्राने सप्टेंबर 2022 मध्ये पंजाब सरकारला पत्र लिहिले होते.