लुधियानामध्ये माणुसकीला काळिमा; पोटच्या पाचव्या मुलीला दोन लाखात विकले, आठ जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील लुधियाना शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आईसह आठ जणांना अटक केली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही घटना लुधियानातील सीएमसी चौकाजवळ घडली. येथे एक महिला नवजात बाळाला घेऊन फिरत असताना बाळ सतत रडत होते. बराच वेळ होऊनही बाळ शांत होत नसल्याने उपस्थित नागरिकांना संशय आला. लोकांनी महिलेला थांबवून तिची कसून चौकशी केली असता तिने धक्कादायक कबुली दिली. तिने हे बाळ 2 लाख 10 हजार रुपयांना विकत घेतल्याचे मान्य केले. ही महिला मोगा जिल्ह्यातील नांगल गावची रहिवासी असून तिचे नाव मनदीप कौर असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता नावाच्या महिलेने 14 फेब्रुवारी रोजी बाबा थान सिंग चौकातील एका खाजगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला होता. सुनीताला आधीच चार मुली होत्या. पाचव्या वेळीही मुलगीच झाल्याने तिचे कुटुंब निराश झाले होते आणि त्यांनी या बाळाची विक्री करण्याचा क्रूर निर्णय घेतला. या कृत्यासाठी रुग्णालयातील एका नर्सची मदत घेण्यात आली होती.

पोलीस तपासात या गुन्ह्याचे धागेदोरे एका मोठ्या साखळीपर्यंत पोहोचले आहेत. या व्यवहारात बाळाची आई सुनीता देवी, नर्स परवीन, बीएएमएस डॉक्टर मनमीत कौर, केअर टेकर रुची, खरेदीदार मनदीप कौर, नर्स आशा, आशा वर्कर पम्मा आणि नर्स गुरमीत कौर यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या आठही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डिव्हिजन क्रमांक 3 चे एएसआय गुरमेल सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून मानवी तस्करीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.