
पंजाबमध्ये शीख धर्मीयांच्या पवित्र निशान साहिब आणि श्री गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केल्याच्या आरोपावरून 24 तासांत ‘मॉब लिंचिंग’च्या दोन घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवारी अमृतसरच्या सुवर्णमंदिरमध्ये घडलेल्या घटनेपाठोपाठ रविवारी कपूरथला जिह्यातील निजामपूर गावातील गुरुद्वार परिसरात संतप्त जमावाने तरुणाची काठय़ांनी बेदम मारहाण करून हत्या केली.
रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निजामपूर गावातील गुरुद्वारमध्ये निशाण साहिबची विटंबना केल्याच्या संशयावरून एका तरुणाला सेवादारांनी पकडले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुद्वारच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर लोक जमा झाले. घटनास्थळी पोलीस आणि जमावामध्ये संघर्ष होता होता टळला. यावेळी संतप्त जमावाकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी जमावाच्या ताब्यातील तरुणाची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र जमावाने त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात न देता काठय़ांच्या साहाय्याने मारहाण करीत त्याची हत्या केली.
तो तरुण चोरीसाठी गुरुद्वारामध्ये गेला होता; पोलिसांचा दावा
कपूरथला जिह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरकमलप्रीत सिंग खख यांनी विटंबनेच्या घटनेचा इन्कार केला आहे. हत्या झालेला तरुण गुरुद्वारामध्ये चोरी करण्यासाठी गेला होता, असे चौकशीतून समोर आले आहे. तेथील लोकांनी तरुणाला पकडले. नंतर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि गुरुद्वार परिसरात जमलेल्या जमावाने तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केली. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला जात आहे, असेही खख यांनी सांगितले.
अमृतसरच्या घटनेची एसआयटी चौकशी
शनिवारी अमृतसरमधील सुवर्णमंदिरामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वातावरण तापले होते. त्यावेळीही संतप्त जमावाने कथित विटंबना करणाऱ्या तरुणाची हत्या केली. पोलिसांनी या तरुणाविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्री गुरु ग्रंथ साहिबला जिवंत गुरूचा दर्जा देण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून पोलिसांनी विटंबना केल्याचा आरोप असलेल्या तरुणावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पंजाब सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे.




























































