
वनपुरी, पारगाव मेमाणे, पुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, उदाचीवाडी आणि खानवडी या सात गावांमध्ये होऊ घातलेल्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने कंबर कसली आहे. सर्व्हे, बैठका, भू-संपादन नोटिसा जारी करणे, अशा प्रक्रिया सुरू केल्या आहेत. मात्र सात गावांतील बाधित शेतकऱ्यांनी विरोधाची धार तीव्र केली असून ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध करण्यात आला आहे.
स्थानिक बैठकांना विरोध, नोटिसा न स्वीकारणे, तहसीलदार कार्यालय येथे तीन दिवसांचे उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा अनेक मार्गांनी बाधित शेतकरी विमानतळाच्या विरोधात आजही कायम आहेत. आज शुक्रवारीदेखील सरकारला ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. सर्व्हेसाठी आलेल्या अधिकारी व आंदोलक यांच्यात दिवसभर शाब्दिक खडाजंगी सुरू होती. सर्व्हे करणारे वाहन अडवून प्रक्रिया बंद करण्यास आंदोलकांनी भाग पाडले.



























































