
>> वैभव शिरवडकर
बाजारात एक लिटर पॅकबंद पाण्याची बाटली 18 ते 20 रुपयांना मिळते आणि त्यातही शुद्धतेची हमी नसते तर पालिका फक्त 4 रुपयांत 1 हजार लिटर शुद्ध पाणी दीड कोटी मुंबईकरांना हमीसह देते.
पालिकेच्या जलअभियंता विभागाचे कर्मचारी महिन्याभरात 358 ठिकाणांवरून 3 हजार पाण्याचे नमुने गोळा करतात. पाण्याचे नमुने तपासण्यासाठी मेंब्रिन फिल्टर टेक्निक (‘एमएफटी’) पद्धत पालिकेच्या या लॅबमध्ये वापरली जाते. या पद्धतीचा वापर करणारी देशातील ही एकमेव पालिका लॅब आहे.
मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सेवा माफक दरात देणारी मुंबई महापालिका गेली सलग पाच वर्षे मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय मापदंडांप्रमाणे शुद्ध पाणी पुरवत आहे. महापालिकेकडून पाण्याच्या शुद्धतेबाबत दर महिन्याला वॉर्डनिहाय पाणी अहवाल तर दरवर्षी वार्षिक पाणी अहवाल सादर करून पाण्याच्या शुद्धतेची माहिती दिली जाते. या अहवालात अशुद्ध पाण्याचे प्रमाण हे 1 टक्क्याहून कमी आढळले आहे. मुंबईकरांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पालिकेचे जलअभियंता खाते आणि पालिका लॅब अहोरात्र मेहनत घेत आहेत.
मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवण्यात पालिकेच्या जलअभियंता खात्याबरोबर आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱया पालिका लॅबचेही मोठे योगदान आहे. महापालिकेच्या या लॅबला डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारचे एनएबीएल प्रमाणपत्र मिळाले आहे. नॅशनल ऍक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ऍण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) ही केंद्र सरकारची संस्था असून ती अन्न-पाण्यासह सर्व प्रकारच्या लॅबच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम पाहते. निकष पूर्ण करणाऱया लॅबना ‘आयएसओ 17025’ हे प्रमाणपत्र देण्यात येते. यालाच एनएबीएलचे प्रमाणपत्र म्हणतात. कोरोना रोखण्यासाठी पालिका दिवस-रात्र झटत असताना गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण करत डिसेंबर 2020 मध्ये हे प्रमाणपत्र पालिकेने मिळवले आहे. लॅबचे नमुने देश आणि परदेश पातळीवरही बिनचूक आहेत. पाण्याच्या शुद्धतेबाबत तर आपण देशपातळीवर पुढे आहोतच, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाणी आपण मुंबईकरांना देत आहोत, अशी माहिती पालिका प्रयोगशाळा विश्लेषक संतोष जठार यांनी दिली.
पाण्यामुळे होणाऱया आजाराचे प्रमाण घटले
मुंबईत 2011 मध्ये अशुद्ध पाण्याचे प्रमाण 24 टक्के इतके होते. या पद्धतीमुळे आता 1 टक्क्यापेक्षा कमी आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, शहरी भागात 5 टक्के तर ग्रामीण भागात 10 टक्के पाणी अशुद्ध असेल, असे गृहित धरले जाते. मात्र, मुंबई महापालिकेने अशुद्ध पाण्याचे प्रमाण 1 टक्क्याहून कमी राखण्यात सलग 5 वर्षे यश मिळवले आहे. शुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले आहे.
वैशिष्टय़े
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, 10 हजार लोकसंख्येला प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे मुंबईच्या लोकसंख्येनुसार 1,250 नमुने महिनाभरात तपासणे आवश्यक आहे. मात्र, पालिका महिनाभरात 3 हजार पाण्याचे नमुने तपासते.
जल खात्याच्या गुणनियंत्रण विभागाने मुंबईत 358 पाणी नमुना ठिकाणे निश्चित केलेली आहेत. येथील पाण्याचे नमुने आरोग्य खाते आणि गुणनियंत्रण विभागामार्फत दररोज (रविवार व सुट्टी वगळून) घेतले जातात. शिवाय मुंबईतील 27 सेवा जलाशयाचे नमुने दरदिवशी या प्रयोगशाळेत तपासले जातात.

























































