उरणमध्ये खारफुटी जाणीवपूर्वक जाळण्याचा प्रयत्न: महसूल आणि वन विभागाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

विकासाच्या नावाने उरण तालुक्यातील डोंगर, जंगले, समुद्र किनारे भकास करण्यात येत असताना थोडाफार पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनाचे जंगलही आत्ता कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नष्ट करण्याचा डाव आखण्यात येत आहे. करंजा- द्रोणागिरी रस्त्यालगत असलेले कांदळवनाचे जंगल देखिल अशाच प्रकारे कचरा टाकून जाळण्याचा प्रयत्न सूरू आहे. मात्र या कांदळवनाची संरक्षणाची जबाबदारी असलेले वन विभाग आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

समुद्र किनारी किंवा खाडी किनाऱ्यावर असलेले हे कांदळवन समुद्रातील जैव विविधता आणि जमिनीची धुप थांबविण्याची महत्वाची भूमिका पार पाडत असतात. एकीकडे यापुर्वीच उद्योगांसाठी आणि जेएनपीटीच्या नविन तीन टर्मिनलसाठी तालुक्यातील खारफुटी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली आहे. या तोडलेल्या खारफुटीची पुर्नलागवड करणे गरजेचे असताना त्याची पुर्नलागवड करण्यात आली नाही. सध्या खोपटा खाडी किनाऱ्यावर या खारफुटीचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र या खारफुटींवर येथिल गावांचा कचरा आणून टाकला जातो आणि नंतर त्या कचऱ्याला आग लावली जाते. या आगीत अनेक खारफुटीची झाडे जळून खाक झाली आहेत. करंजा- द्रोणागिरी नोड कोस्टल रोडच्या बाजूला तसेच खोपटा पुलाच्या बाजूला अशा प्रकारे कंपन्यांचा आणि गावांचा कचरा बेकायदेशिरपणे टाकून जाळला जातो. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हे दिसत असून देखिल ते या बाबत कारवाई करण्यास धजावत नाहीत.

या बाबत उरण परिक्षेत्राचे वनाधिकारी शशांक कदम यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.