>> पुरुषोत्तम बेर्डे
मराठी रंगभूमी, सिनेमा, मालिका यांसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱया अतुल परचुरे या कसदार अभिनेत्याची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि नियतीने त्याला आपल्यातून हिरावून नेलं आहे. त्याचं निधन सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. अतुलची मेमरी अतिशय शार्प होती. लुक छान होता. विनोदाची शैलीही अफलातून होती. त्यामुळे अतुलचा अभिनय प्रवास अडखळला नाही. उंची कमी असली तरी त्याच्या गोलमटोलपणामुळे खूप चांगल्या भूमिका त्याला मिळत गेल्या. ‘नातीगोती’मध्ये बच्चू नावाच्या एका मतिमंद मुलाची संवाद नसणारी व्यक्तिरेखा अतुलने हावभावांच्या ताकदीवर लोकप्रिय केली. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात त्यानं साकारलेला मुकुंदाही प्रेक्षकांना भावला.
राठी रंगभूमी, मालिका, चित्रपटांबरोबरच हिंदी सिनेसृष्टीमध्येही आपल्या अभिनयाची वेगळी शैली जपत छाप उमटवणाऱया अतुल परचुरे या उमद्या अभिनेत्याच्या निधनाची बातमी सर्वांनाच धक्का देणारी ठरली. साधारण वर्षभरापूर्वी त्याने एका पॉडकास्टमध्ये आपल्याला कर्करोग झाल्याचे जाहीरपणाने सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. एका नाटकाच्या रिहर्सलच्या दरम्यान मी अतुलला पाहिले तेव्हा मीही हादरलो होतो. त्या वेळी तो नुकताच आजारातून उठला होता. त्यामुळं त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पाच-सहा महिन्यांपूर्वी माझी आणि त्याची भेट झाली. तेव्हा तो आऊट ऑफ डेंजर होता, पण अतुलला कॅन्सरने गाठणं हेच मुळात दुःखद होतं. कर्करोगाची लागण झाल्यानंतर या विषाणूंनी अतुलचे जे सर्व प्लस पॉईंटस् होते तेच मायनस झाले. त्यामुळे हा चांगला अभिनेता एकाएकी दुर्बळ बनला. त्याला सतत काळजी घेऊनच जगावे लागत होते. अन्यथा अतुलचे एकाहून एक सुंदर परफॉर्मन्सेस मी पाहिले आहेत. त्याची प्रत्येक एंट्री ही आनंददायी असायची. असे असताना एके दिवशी अचानक दुःखद बातमी येणे हे चटका लावून गेले.
व्यक्तिश माझ्या पूर्वीच्या एकाही नाटकात किंवा सिनेमामध्ये अतुलने काम केलेले नाही, पण ‘टुरटूर’ या महत्त्वाच्या नाटकामध्ये अतुलने काम केलेलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही दौरेही झाले. अतुल हा विजय केंकरेंचा मित्र. त्यामुळे पूर्वी शिवाजी मंदिरच्या प्रयोगांना तो आवर्जून यायचा. त्या वेळी तो लहान होता. विजयने एकदा माझी आणि त्याची ओळख करून दिली. पाहताक्षणीच त्याच्यातील स्पार्क लक्षात आला होता. पुढे एका दौऱयादरम्यान प्रशांत दामले यांना काही अडचणींमुळे सहभागी होता येणार नसल्याने त्यांचे कास्टिंग रिप्लेस करायचे होते. त्या वेळी विजय चव्हाण मला म्हणाला की, आपण अतुलला घेऊया. त्यांनी साकारलेली गुजराती व्यक्तिरेखा अतुलने केली होती. मला आठवतंय ती भूमिका पाहून माझ्यासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लहान वयातही त्याच्या अभिनयाची ताकद, क्षमता अफाट आहे हे त्या भूमिकेमुळे मला उमगलं.
नंतरच्या काळात विनय आपटेंच्या ‘अफलातून’ या नाटकामध्ये अतुलचं कास्टिंग झालं. या नाटकातील अतुलची भूमिका लोकांच्या डोळ्यांत भरली. विश्राम बेडेकरांनी लिहिलेल्या ‘टिळक आणि आगरकर’ नाटकातून अतुलने व्यावसायिक नाटकांत पदार्पण केलं. ताकदीचा नट असल्यामुळं एकामागून एक भूमिका त्याला मिळत गेल्या. अतुलची मेमरी अतिशय शार्प होती. लुक छान होता. विनोदाची शैलीही अफलातून होती. त्यामुळं अतुलचा अभिनयप्रवास अडखळला नाही. अभिनयातून आचरटपणा, बावळटपणा दाखवण्याचीही त्याची स्वतची एक पद्धत होती. त्यात कुठेही अंगविक्षेप नसायचे. त्याचा विनोदाचा सेन्सही अतिशय उत्तम होता. भाषेवरचं प्रभुत्वही उत्तम होतं. डिक्शनवर त्याची कमांड होती. याखेरीज सहकलाकारांची एंट्री-एक्झिट याविषयीचं ज्ञान होतं. थोडक्यात, थिएटर करण्यासाठी कलाकाराकडे ज्या गोष्टी असणं आवश्यक असतं त्या सर्व अतुलमध्ये परिपूर्ण होत्या.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणाऱया पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अतुल हा एकमेव कलाकार होता. त्यानंतर पुलंवर कोणतीही कलाकृती करायची झाल्यास दिग्दर्शकांना अतुलचीच आठवण यायची. स्वत पुलंनी अतुलच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. नंतरच्या काळात त्याची ‘गुरू’सारखी काही नाटकं पाहायला मिळाली.
अतुलची उंची कमी असली तरी त्याच्या गुबगुबीत किंवा गोलमटोलपणामुळे खूप चांगल्या भूमिका त्याला मिळत गेल्या. दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू यांच्यासोबत ‘नातीगोती’मध्ये त्याने अतिशय सुंदर अभिनय केला. बच्चू नावाच्या एका मतिमंद मुलाची संवाद नसणारी व्यक्तिरेखा अतुलने आपल्या हावभावांच्या ताकदीवर लोकप्रिय केली. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात त्याने साकारलेला मुकुंदाही प्रेक्षकांना भावला. ‘गुरू’ नाटकातील त्याची भूमिकाही मला आवडली होती. पाच-सहा वर्षांपूर्वी ‘झी’साठीच्या एका इव्हेंटमधील माझ्या स्किटमध्ये अतुल आणि विजय कदम झळकले होते.
मुंबईमध्ये आमच्या अनेकदा भेटी व्हायच्या. एकत्र काही तरी करू या असं ठरायचंही. पण नंतरच्या काळात तो हिंदी सिनेमा, मालिका यांच्यामध्ये गुंतला आणि मीही अधूनमधून नाटक, सिनेमा करू लागलो. त्यामुळे एकत्र काम करण्याचा योग जुळून आला नाही. असं असलं तरी माझी सर्व नाटकं त्याने पाहिली आहेत. अनेक नाटकांना तो येऊन बसायचा आणि नाटक पाहून त्यावर कमेंटही करायचा.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार घेऊन त्यानं कमबॅकही केलं होतं. ‘सूर्याची पिल्ले’च्या जाहिरातीत त्याचा फोटोही दिसायचा, पण नंतर तो दिसेनासा झाला आणि आता तर त्याने या जगातूनच एक्झिट घेतली. मराठी रंगभूमीच्या दृष्टीने त्याचा हा वियोग अतिशय दुःखद आहे. 57 व्या वर्षी एक सशक्त नट आपल्यातून निघून गेला आहे. अतुलला आणखी आयुष्य मिळालं असतं तर 10-20 वर्षांत त्याने अनेक चांगल्या भूमिका निश्चितपणे केल्या असत्या, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. येणाऱया काळात त्याच्या भूमिकांचं कलेक्शन छोटय़ा पडद्यावर आणि समाज माध्यमांवर पाहायला मिळेल. ते पाहताना अतुल आपल्यात नसण्याची खंत सदैव जाणवत राहील.