अखंड पुरुक्रमा सुरू…

791

>> पुरुषोत्तम बेर्डे, सिने-नाटय़दिग्दर्शक<<

मी कधी गप्प बसणारा माणूस नाही. माझं काही ना काही सुरू असते. आताही लॉकडाऊनमध्ये मी स्वस्थ बसलेलो नाही. अलीकडच्या काळात मी कामाशिवाय घराबाहेर पडत नव्हतो. घरी बसून लेखन सुरू होतं. तुम्हाला माहीत असेल की नुकतंच ’क्लोज एन्काऊंटर’ हे माझं पुस्तक आलंय. लॉकडाऊनच्या दिवसांत मी त्याचा भाग दोन पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. पूर्वी मी नाटक आणि सिनेमापलीकडे लिहीत नव्हतो. पण सोशल नेटवर्किंग साईट्सवर लेख लिहिले होते. त्याचेच हे पुस्तक आहे. ’क्लोज एन्काऊंटर पार्ट 2’ मध्ये कोकणाची पार्श्वभूमी, माझं सिनेनाटय़पर्व, माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तिरेखा असं सगळं असेल.

या दिवसांत ‘पुरुक्रमा’ या माझ्या एकपात्री शोचे डिझाईन करतोय. याआधी ‘पुरुक्रमा’चे दोन – तीन प्रयोग झाले होते. यापुढे शो मोठय़ा प्रमाणात करायचा विचार करतोय. त्याचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे. पुरुक्रमा शोमध्ये नाटक, सिनेमांचे किस्से, संगीत, पुस्तकाचं अभिवाचन आहे. त्यात मी वेगवेगळ्या वाद्यांचे लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन करतो. सध्या काय झालंय, माझी सगळी वाद्ये पुण्याला मुलीकडे राहिली. त्यामुळे इथे काहीच वाद्यं नव्हती. मग मी काही प्रयोग केले. मी ताटवाट्यापासून टेबलापर्यंत सगळं वाजवून नऊ- दहा गाणी सोशल मीडियावर टाकली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कधी प्लॅस्टिकचे बाऊल वाजवले, तर कधी बाटली वाजवून साईड रिदम केलं. त्यासोबत गाण्यातील मूळ वाद्य कुठलं होतं, ते कसं वाजवलं होतं याची माहितीही दिली.

ग्वाल्हेरच्या ‘मेरा मंच’ या संस्थेसाठी ‘थिएटर’ या विषयाकरची दोन व्याख्यानं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. राजेश देशपांडेच्या ‘सृजन’ संस्थेसाठी ऍडव्हर्टाईजिंग या विषयावर लेक्चर दिलं. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या थिएटर ऑफ ऍकॅडमीच्या विद्यार्थांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेतली. बरीचशी चित्रे काढली.

आमचे आध्यात्मिक गुरू रामकृष्ण क्षीरसागर यांच्या ग्रंथांचं मी पठण केलं. माझ्या आवाजात रेकॉर्ड करून जगभरातील शिष्यगणांपर्यंत ते पोचवण्यात आलं. जवळपास असं शंभरी तरी भाग मी रेकॉर्ड केले असतील. एकूण काय तर लेखन दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी माझी बहुरंगी भूमिका मी घरी बसून निभावतोय.

वाईट तर वाटतंय

गेल्या वर्षी माझी मुलगी लग्नानंतर पुण्याला राहायला गेली. तिला भेटण्यासाठी एवढा मोठा गॅप कधी पडला नव्हता. तसंच आता कोकणात जाऊ शकत नाही. याचंही वाईट वाटतंय. आमची एंटरटेनमेंट इंडस्ट्री सगळ्यात आधी बंद झाली. आता सगळ्यात शेवटी ही इंडस्ट्री सुरू होईल. लाईव्ह एंटरनेटमेंटला मोठा फटका बसलाय. या साऱयाचं वाईट तर वाटतंय. पण आपला सर्वांचा नाईलाज आहे. संकटच इतकं मोठं आहे की, आपल्या हातात काहीच नाही. वाट बघण्याशिवाय…

आपली प्रतिक्रिया द्या