राष्ट्रपती पुतीन यांना विरोध करणाऱया नेत्यावर विषप्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियातील भयंकर राजकारण पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक एलेक्सी नवलनी यांच्यावर विमानात चहामधून विषप्रयोग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एलेक्सी यांची प्रकृती चिंताजनक असून, ते कोमात गेले आहेत.

एलेक्सी हे सायबेरियावरून मॉस्कोला परत येत होते. या प्रवासात एलेक्सी यांनी विमानात चहा घेतला. त्यानंतर एलेक्सी यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने ओमस्कला येथे विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. तातडीने रुग्णालयात दाखल केले. एलेक्सी यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. ते कोमात गेले आहेत. चहामधून घातक विषप्रयोग करण्यात आल्याचे एलेक्सी यांच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. दरम्यान, रशियातील वृत्तसंस्था ‘टास’ने विषप्रयोगाची माहिती मिळाली नसल्याचे वृत्त दिले आहे.

पुतीन सरकारच्या भ्रष्ट्राचाराविरुद्ध आवाज उठविला

रशियात राष्ट्रपती पुतीन यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. पुतीन सरकारविरूद्ध आवाज उठविणाऱ्या विरोधकांचा यापूर्वीही छळ झाला आहे. सरकारच्या भ्रष्ट्राचारविरूद्ध आवाज उठविणारे एलेक्सी हे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आहेत. त्यांनी रशियातील भ्रष्ट्राचाराविरोधात लढण्यासाठी एक फाऊंडेशनही स्थापन केले होते. ते 2018 मध्ये पुतीन विरोधात निवडणूक लढणार होते. मात्र, त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते.