जन सुरक्षा कायदा आणून भाजप सरकार आंदोलकांना नक्षलवादी ठरवेल, शेकापच्या जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले कायदे बदलण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. सरकार  जनसुरक्षा विधेयक आणून सर्वसामान्यांचे आंदोलन करण्याचा अधिकारच  काढून घेणार असून हा कायदा अस्तित्वात आलाच तर  आंदोलनकर्त्यांना अर्बन नक्षलवादी  ठरवून तीन वर्षे तुरुंगात टाकले जाईल अशी भीती  शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केली.

शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा अलिबाग तालुक्यातही पेझारी येथे रविवारी  पार पडला. .यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या दुटप्पी राजकारणाची पोलखोल केली. भाजपवाले भ्रष्टाचाराचे आरोप करून राजकीय  नेत्यावर  एका दिवसात  ईडी लावतात. आणि  तो भाजपमध्ये आल्यावर त्याला शुद्ध म्हणतात अशी टीका पाटील यांनी  केली.  ज्यांना आम्ही मोठे केले ते आम्हाला सोडून गेले. शेकापने असे अनेक धक्के पचविले आहेत. आगामी निवडणुकात शेकाप जिल्ह्यात आपली ताकद दाखवेल, असा विश्वास व्यक्त करीत, शेकाप इंडिया आघाडीसोबतच आगामी निवडणुका लढेल असे जाहीर केले.या मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी संघटिका अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, अतुल म्हात्रे उपस्थित होते.