
यंदाच्या क्यूएस जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईने जगातील पहिल्या 150 उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत 149 वे स्थान पटकावले आहे. जगभरातील तब्बल दीड हजार उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाद्वारे क्यूएस रँकिंग 2024 नुकतेच जाहीर झाले. मुंबई आयआयटीने 23 स्थानांची झेप घेत पहिल्या 150 संस्थांच्या यादीत येण्याचा मान मिळविला. या यादीत अमेरिकेतील एमआयटी संस्था अव्वल ठरली असून केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर आहेत. ‘क्यूएस’ने जाहीर केलेल्या आशिया खंडातील 500 संस्थांच्या क्रमवारीमध्ये
हिंदुस्थानातील 45 विद्यापीठे असून चीन (71) आणि जपानमधील (52) संस्थांचा समावेश आहे. क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी दिल्लीने 197 वे स्थान पटकावले असून बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स 225 व्या स्थानी आहे. आयआयएसच्या मानांकनात यंदा 70 स्थानांची घसरण झाली असून ते 155 व्या स्थानावरून 225 व्या स्थानी पोहोचले आहे. या वर्षी प्रथमच 3 नवे निर्देशक शाश्वत उपक्रम, रोजगारनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन हे तीन नवे निकष मानांकनासाठी वापरण्यात आले आहेत. या तीन निकषांमुळे अन्य मुद्दय़ांचे बल काहीसे घटले आहे. रोजगारनिर्मितीच्या निकषात मुंबई आयआयटीची कामगिरी इतरांपेक्षा सरस राहिली आहे. यंदा दिल्ली विद्यापीठ (407) आणि चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाने (427) या यादीमध्ये प्रथमच स्थान पटकाविले आहे. या मानांकन यादीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ 711-720 स्थानावर आहे, तर मुंबई विद्यापीठाने 751-760 दरम्यान स्थान मिळविले आहे.



























































