आयपीएलच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा घसरतोय, सर्व संघांमध्ये झेल सोडण्याची शर्यत

क्रिकेटमध्ये झेल हे सामने जिंकून देतात, तसेच सोडलेला एक झेलही संघाला पराभवाच्या दरीत ढकलतो. हे समीकरण कधीच कुणापासून लपलेलं नाही. मात्र सध्या आयपीएलमध्ये सारेच संघ क्षेत्ररक्षणाकडे काणाडोळा करताहेत हे सत्य प्रत्येक सामन्यागणिक समोर येऊ लागलेय. खेळाडू फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीचाच जीव तोडून सराव करताहेत. साऱ्यांसाठी क्षेत्ररक्षण हे दुय्यम झाल्यामुळे आयपीएलची फिल्डिंग कचखाऊ झालीय. साऱ्यांना एकच प्रश्न पडलाय, फिल्डिंग कोच करतात तरी काय?

टी-20 क्रिकेटच्या झंझावाताने जंटलमन क्रिकेटला अधिक हिंसक बनवलेय. क्रिकेटमधली कलात्मकता दिसणे कठीण झालेय. पुस्तकातले फटके आता विस्मरणात गेलेत. आता फक्त उरलीय ती म्हणजे फक्त हाणामारी.  रणांगणात तलवार घेऊन उतरायचे आणि प्रत्येक चेंडूला उंचावर मारायचे. विकेट गेली तरी बेहत्तर. दोनशे-तीनशेच्या स्ट्राईक रेटने धावा काढायच्या आणि आपली जबाबदारी पार पाडून पुन्हा डगआऊट गाठायचे. टी-20 क्रिकेट हे हॉलीवूडच्या अॅक्शन सिनेमांसारखे झालेय. जिथे उठसूट फक्त जीवघेणी धावपळच असते. आयपीएलमध्येही वारंवार तेच दिसतेय.

मात्र या हाणामारीत क्षेत्ररक्षणाला कमी लेखण्याची चूक होतेय. सोप्पे सोप्पे म्हणजेच हलवा झेल क्षेत्ररक्षकांच्या हातातून अलगद सुटत आहेत. तेव्हा आपसूकच क्रिकेटप्रेमींच्या तोंडातून निघतेय, यांच्यापेक्षा गल्लीतले खेळाडू बरे.  हे वाक्य थेट आयपीएलच्या फिल्डिंगची लाज काढणारे ठरतेय. दुसरीकडे आयपीएलमध्ये मॅचफिक्सिंगची घुसखोरी तर झाली नाही ना, असा संशयही मनी येऊ लागलाय. इतके सोप्पे झेल सुटतात तरी कसे? फिल्डिंग कोच फक्त खुर्च्या गरम करायला असतात का ? गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

झेलांची ऐशीतैशी

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वच संघांनी सहज आणि सोप्पे झेल सोडलेत. धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत तळाला असला तरी झेल सोडण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यांच्या लाजिरवाण्या कामगिरीत सुटलेल्या झेलांचा सिंहाचा वाटा आहे. आयपीएलचा आतापर्यंतचा टप्पा पाहिला तर प्रत्येक सामन्याला सोप्पे झेल सुटलेत. काही संघाचे एक तर काहींचे दोन. झेल सोडण्यात चेन्नईसह दिल्ली, पंजाब आणि लखनौ या संघांची नावे घ्यावीच लागतील. सामन्याला दोन किंवा तीन झेल या संघांनी सोडलेत. गेल्या दोन-चार दिवसांचे बोलायचे तर कृणाल पंडय़ाचा पोरेलने सोडलेला झेल असो किंवा शिमरॉन हेटमायरच्या हातून निसटलेला सोप्पा झेल… हे झेल पाहून क्रिकेटप्रेमींच्या मनात शंका निर्माण झालीय. फटकेबाजीच्या नादात क्षेत्ररक्षणाची ऐशीतैशी झालीय. आता फ्रेंचायझीला आपल्या खेळाडूंच्या अवतीभवती आपली फिल्डिंग टाइट करावी लागेल. प्रशिक्षकांनाही धारेवर धरावे लागेल. अन्यथा आयपीएल फक्त फलंदाजांचा खेळ उरेल.