ब्राझीलमधून आलेल्या प्रवाशांनाही क्वारंटाइन बंधनकारक

इंग्लंडसह युरोप, पूर्व मध्य आशिया, दक्षिण आफ्रिकेसह आता ब्राझीलमधून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणी करूनच हिंदुस्थानात येणे बंधनकारक असून त्यानंतरही त्यांना सात दिवस हॉटेल आणि सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक जाहीर केले आहे.

पहिल्या सात दिवसांत होणाऱया चाचणीत त्यांना कोविडची बाधा असल्याचे आढळल्यास अथवा विमानतळावर त्यांच्यात कोविडसदृश लक्षणे आढळल्यास युकेमधून आलेल्या प्रवाशांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. तर इतर देशांतून आलेल्या रुग्णांना फोर्ट येथील जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या रुग्णांना बॉम्बे, रहेजा, हिंदुजा आणि रिलायन्स या चार खासगी रुग्णालयांतही उपचार घेता येतील अशी सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, परदेशातून आलेल्या प्रवाशांना कोविडची बाधा असल्याने त्यांना सेव्हन हिल्स, जी.टी. रुग्णालय या सार्वजनिक रुग्णालयांबरोबरच पाच खासगी रुग्णालयांत उपचार करून घेण्याची परवानगी महानगरपालिकेने दिली आहे. या रुग्णालयांची यादी आज महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या