
राज्य शासनाने हॉटेल व लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी पर्यटक व व्यावसायिकांनी कोरोना खबरदारी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच परजिल्यातून येणाऱ्या पर्यटकांना 14 दिवस क्वॉरंटाईनची सक्ती नाही, असे मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले. दोन ते चार दिवसांसाठी येणाऱ्या पर्यटकांना क्वॉरंटाईन केले जाणार नसले तरी जास्त दिवसांसाठी मालवणात वास्तव्यास येणाऱ्यांना क्वॉरंटाईन बंधनकारक आहे, असेही तहसीलदार पाटणे यांनी सांगितले.
पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रवेश द्यावा. सॅनिटायझर व अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात यावी. रूम निर्जंतुकिकरण करावेत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी वारंवार पर्यटकांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घेऊन सेवा द्यावी. पर्यटक नोंद व्यवस्थित ठेवून शक्य असल्यास ऑनलाईन बिल स्वीकारावे. पर्यटकांना प्रकृती अस्वास्थ जाणवल्यास त्याची तात्काळ रुग्णालयात तपासणी करावी. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहनही तहसीलदार पाटणे यांनी केले आहे. कोरोना काळात 10 वर्षाखालील मुले, 65 वर्षांवरील व्यक्ती आणि आजारी व्यक्ती यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच गरोदर स्त्रियाची देखभालही महत्वाची आहे. त्यामुळे या व्यक्तींनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहनही पाटणे यांनी केले आहे.
तारकर्ली पर्यटन विकास संस्था आणि शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह पर्यटन व्यवसायिकांनी सोमवारी तहसीलदार अजय पाटणे यांचे निवेदनाद्वारे विविध समस्यांकडे लक्ष वेधले होते. वर्षभरातील वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटन व्यावसायिक संकटात आहेत. क्यार वादळ, डिसेंबरमध्ये वादळसदृश स्थिति, जूनमध्ये आलेले निसर्ग वादळ तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात पर्यटन ठप्प आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेल्या होम स्टेधारकांची, हॉटेलधारकांची, लॉजिग मालक, बोटींग मालक, वॉटर स्पोर्ट चालक, स्कुबा डायव्हिंग सेवा धारक, गाईड, रेस्टॉरंट चालक, टुरिस्ट व्हेईकल धारक यांची आर्थिक स्थिति दयनीय झाली आहे. कोरोना संकट काळात या व्यवसायिकांना कर्जात सूट, लाईट बिल पाणी पट्टीत सूट मिळावी, जीएसटी भरणा करणाऱ्यांना सूट मिळावी. आगामी काळात कमी व्याज दराने कर्जपुरवठा व्हावा. यासह विविध 11 मागण्यांचे निवेदन तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने देण्यात आले.
सुलभ पर्यटन व्यवसायासाठी शिवसेना प्रयत्नशील
पर्यटन व्यवसाय सुलभ व सुरळीत सुरू राहावा यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. पर्यटन व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटन व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. कोरोना खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना पर्यटन व्यवसायिकांनी अंमलात आणाव्या याबाबत माहिती प्रशासनाने व्यवसायिकांना द्यावी. याबाबत निवेदन खोबरेकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे. तसेच बंदर विभागानेही जल पर्यटन सुरू होण्यासाठी नियमावली सादर करावी. आम्हीही शासनाचे लक्ष वेधू असेही खोबरेकर यांनी सांगितले.



























































