
सिगारेट हे एक असं व्यसन आहे ज्यामुळे शरीर आतून एक प्रकारे पोखरलं जातं असतं. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य धोक्यात येतच शिवाय धूम्रपान करत असताना ती व्यक्ती इतरांचा जीव धोक्यात टाकत असते. अनेकजण सुरुवातीला फॅशन किंवा स्टाइल स्टेटमेंट म्हणून सिगारेट ओढणं सुरू करतात. मात्र कालांतराने ही सवय एक व्यसन बनून जाते जी सोडणं अत्यंत कठिण ठरतं. सिगारेटचं व्यसन जडल्यानंतर ते सोडवण्यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात.मात्र यात सगळ्यांना यश मिळत नाही.
शिवाय सिगारेट सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरात असे काही बदल घडू लागतात ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा काही दिवसातच सिगारेट ओढणं पुन्हा सुरू करते. अभ्यासानुसार प्रत्येकी ३ धूम्रपान कऱणाऱ्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती सिगारेट सोडू इच्छिते. यातील ५० टक्के लोक प्रयत्नदेखील करतात. मात्र केवळ तीन ते सहा टक्के लोकांना धूम्रपान सोडण्यात यश येते.
डॉक्टरांच्या मते सिगारेट सोडल्यानंतर केवळ १५ मिनिटांच्या आताच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक बदल घडणं सुरू होतं. तर एखाद्या व्यक्तीने संपूर्णपणे सिगारेट सोडल्याच्या १५ वर्षांनंतर ती इतर हेल्दी व्यक्तीप्रमाणेच हेल्दी होते. जर एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षांपासून सिगारेट ओढण्याची सवय असेल. तर हे व्यसन सोडताना त्याला काही शारीरक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा या समस्या सिगारेट सोडण्याच्या केलेल्या संकल्पापासून व्यक्तीला पुन्हा दूर नेऊ शकतात.
सिगारेट सोडल्यानंतर काही दिवस झोप न येणं, चिडचिड होणं आणि अनावश्यक राग येणं, कामावर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणं, भूक न लागणं, हृदयाचे ठोके वाढणं, कासाविस होणं अशा अनेक गोष्टी घडू शकतात.
यामुळे पुन्हा एखादी सिगारेट ओढण्याची इच्छा होते. मात्र यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. यातील काही समस्या कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधं देतील. तसचं तुमचं समुपदोशन करतील. यामुळे तुम्हाला व्यसन सोडणं सोप होईल.
सिगारेट बंद केल्यानंतर तुम्हाला जरी थोडा शारीरक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिगारेट बंद केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच शरीरात चांगले बदल घडू लागतात. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच हे व्यसन सोडाल.
सिगारेट बंद केल्यानंतर शरीरात होणारे बदल
सिगारेट किंवा तंबाखू सोडल्यानंतर म्हणजेच हे व्यसन सोडल्यानंतर २० मिनिटातच ब्लड प्रेशर नॉर्मल होतं.
८ तासांनतर शरीरामध्य कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण निम्मे कमी होते.
तीन दिवसांमध्येच श्वास घेण्याची क्षमता अधिक चांगली होते.
सिगरेट सोडल्यानंतर २ महिन्यांनी हृदय आणि फुफ्फुसाचं कार्य अधिक चांगलं काम करू लागतं.
एक वर्षानंतर हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
पाच वर्षांनंतर स्ट्रोक किंवा लकवा याचा धोका एखाद्या सामान्य व्यक्तीइतका कमी होतो.
१० वर्षांनंतर लंग कॅन्सरचा धोका देखील कमी होतो.
तर सिगरेट सोडल्याच्या १५ वर्षांनंतर त्या व्यक्तीचं शरीर हे एखाद्या निर्व्यसनी व्यक्तीसारखं आरोग्यदायी होतं.
यासाठीच वेळीच सिगरेटचं व्यसन सोडल्यास भविष्यात उद्भवणारे धोके कमी होवून एक आरोग्यदायी आयुष्य जगता येऊ शकतं.
धूम्रपान सुटत नाहीये ?
‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. एका संशोधनातून समोर आले आहे की, हिंदुस्थानात सुमारे २६७ दशलक्ष तंबाखू वापरकर्ते आहेत आणि इतका तंबाखू खाणारा हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे.
१५ वर्षांवरील १०० दशलक्षाहून अधिक लोक सिगारेट ओढतात आणि धूम्रपानामुळे त्रासलेले असतात. हा फक्त आपल्या देशापुरता आकडा आहे आणि जर संपूर्ण जगाचा विचार केला तर तो किती असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. एकदा तुम्हाला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागल्यानंतर तुमचे आयुष्य १८% पेक्षा जास्त कमी होते. फुप्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिगारेट ओढणे.
१) पहिले पाउल –
तुमचे ध्येय धूम्रपान सोडणे हे आहे आणि जोपर्यंत तुम्हाला सर्व बाजूंनी त्याचा दबाव जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही सहजासहजी धूम्रपान सोडू शकणार नाही. तुम्ही उचललेले पहिले पाऊल म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे वातावरण तयार करा जे तुम्हाला धूम्रपान सोडण्याची प्रेरणा देईल. एकाच वेळी खूप मोठे लक्ष्य ठेवू नका, हळूहळू प्रयत्न करा.
२) फोन आणि अॅप्सची मदत घ्या
फोनच्या मदतीने सिगारेटचे व्यसन सोडले जाऊ शकते. अनेक अॅप्स या कामात मदत करतात. सिगारेटपासून मुक्ती मिळवण्यासाठी या अॅप्सचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या सोयीनुसार अनेक प्रकारचे अॅप्स उपलब्ध आहेत.
३) वैद्यकीय मदत घ्या
अनेक पुनर्वसन शिबिरे आहेत ज्यांची मदत घेतली जाऊ शकते. आपण वैद्यकीय मदत घेऊ शकता आणि तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी, डॉक्टर काही औषधे देखील लिहून देऊ शकतात. यासाठी तुम्ही नॉर्मल फिजिशियनपासून सायकॉलॉजिस्टपर्यंत सर्वांशी बोलू शकता.
४) जेव्हा तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा छंद जोपासा.
जर तुम्हाला धूम्रपान करण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याऐवजी एखादा छंद सुरू करता येईल.
५) पुदिना खा
ज्याप्रमाणे धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यावर च्युइंग गम मदत करते, त्याचप्रमाणे मिंट खाल्ल्यानेही फायदा होतो. पेपरमिंट कँडी नेहमी आपल्यासोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकता.
६) निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वापरून पाहा
जर तुम्हाला सिगारेट ओढण्याची खूप सवय असेल तर तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी करून पाहू शकता. यामुळे तुमची सिगारेट ओढण्याची सवय पूर्णपणे कमी होऊ शकते. ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी धूम्रपान सोडल्यामुळे होणारी चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत करू शकते. हे करण्याआधाी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.






























































