
सामना प्रतिनिधी । नगर
दोन महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अतर्गत वाद चांगलाच पेटला होता. अखेर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. राहुल गांधीच्या दौर्याच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. 27 एप्रिलला आपण पुढील भूमीका स्पष्ट करु असे विखे यांनी सांगितल्यामुळै आता ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडावी असा विषय घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देणार नाही अशी ठाम भूमीका घेतली होती. स्वतः राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनी त्या वेळेला पवारांची भेट घेऊन विनंतीही केली होती. मात्र, ती विनंती त्यांनी मान्य केली नाही. अखेरीला काँग्रेस देखील नगरच्या जागेबद्दल म्हणावा असा आग्रह धरला नव्हता. निवडणुकीच्या ऐन तोंडावर डॉ.सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत होण्यास सुरुवात झाली होती. त्यापुर्वी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली हेाती. मात्र, त्यावेळेला राधाकृष्ण विखे यांनी त्याचे खंडणही केले होते. योग्य वेळ आल्यावर यावर बोलू असे सुचित केले होते.
नगर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करणार नाही यांनी थेट भूमीका जाहीर केली होती. नगरमध्ये त्यांनी बहुतांश वर्गाच्या भेटी घेऊन त्यांनी सुजय विखे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळेला टिकेची संधी काँग्रसेने सोडली नाही. त्यांचे कट्टर विरोधाक आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर पुन्हा तोप डागत जाहीर टीका केली. त्यामुळे पुन्हा थोरात विरुध्द विेखे असा वाद सुरु झाला. त्याच दरम्यान राधाकृष्ण विखे हे पक्ष सोडतील अशी चर्चा होती. परंतु त्यांनी त्यावेळी या गोष्टीला थारा दिला नाही. मात्र, उद्या राहुल गांधी यांची संगमनेरमध्ये सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर पक्षाने कारवाई करण्याअगोदरच आपला विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मंजुर झाल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी गुरुवारी सकाळी करण ससाणे यांनी देखील जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
राधाकृष्ण विखे यानी आज दिलेल्या विरोधीपक्षाच्या राजीनाम्यानंतर ते पक्षात राहणार की नाही या बाबत 27 एप्रिलला रोजी आपली भूमीका आपण स्पष्टपणे मांडू असे सांगितले आहे. त्यामुळे आता विखे काँग्रेसमध्ये राहणार की नाही या बाबत विविध तर्क वितर्क मांडले जात आहे. गुरुवारी तात्काळ विखे समर्थकांची बैठक शिर्डीत आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे या बाबतचे निर्णय या बैठकीत होणार आहे तर या बैठकीत काँग्रेस पक्षात राहायचे की अन्य पक्षात जायचे याची चर्चा होणार आहे.




























































