राधिका आपटेला अॅमी अॅवॉर्ड नामांकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटांपेक्षा वेबसिरीजमुळे घराघरात पोहोचलेल्या राधिका आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रीला तिच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजमधील अभिनयामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अॅमी अॅवॉर्ड सोहळ्यात नामांकन मिळाले आहे. या सोहळ्यात ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘दी रिमिक्स’ या तीन हिंदुस्थानी वेबसिरीजनाही नामांकने जाहीर झाली आहेत. आता 25 नोव्हेंबरला होणाऱ्या 47व्या अॅमी अॅवॉर्ड सोहळ्यात राधिकाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात का पाहायचे.

‘लस्ट स्टोरीज’च्या चार दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अनुराग कश्यप यांनी इन्स्टाग्रामवरील आपल्या अकाऊंटवर राधिकाला नामांकन मिळाल्याची पोस्ट टाकली आहे. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिका असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजचे दिग्दर्शनही कश्यप आणि नीरज घायवान यांनी केले आहे. या वेबसिरीजच्या दुसऱ्या सत्राला ‘बेस्ट ड्रामा’ या विभागात नामांकन देण्यात आले आहे. आता ही वेबसिरीज ब्राझिलच्या ‘कॉन्ट्रा टोडोज-3’, जर्मनीच्या ‘बॅड बँक्स’ आणि ब्रिटनच्या ‘मॅकमाफिया’ या वेबसिरीजना टक्कर देणार आहे.