
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) वादग्रस्त उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल गायकवाड यांना व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले आहे.
राधेश्याम मोपलवार यांची एमएसआरडीसीमधील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांची प्रकरणे गाजली होती. विशेष म्हणजे 2018 मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांना सात वेळा मुदतवाढ मिळाली होती. यापूर्वी कुणालाही अशी मुदतवाढ मिळाली नव्हती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना हटवण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्गाचे काम मोपलवार यांच्या अखत्यारितच झाले होते. मोपलवार यांना सातत्याने मुदतवाढ का दिली जाते यावरून उलटसुलट चर्चा होऊ लागली होती. एकच अधिकारी प्रत्येक सरकारचा इतका लाडका का, अशी टीकाही होत होती.

























































