
आम्ही रक्त आणि घाम गाळून पै पै कमवली आणि त्यातून आमच्या मुलाबाळांना, आई-वडिलांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी डोक्यावर हक्काचे छप्पर घेतले. पण ही इमारत बेकायदा ठरवून तुम्ही जमीनदोस्त का करताय? पावसाळ्यात आमची घरे उद्ध्वस्त करून आम्हाला रस्त्यावर आणू नका हो.. असा टाहो आज राघो हाईट्स या इमारतीतील रहिवाशांनी फोडला. ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्यांदा गेलेल्या पालिकेच्या पथकाला या रहिवाशांनी रोखले. त्यांच्या तीव्र विरोधामुळे या पथकाला माघारी फिरावे लागले.
डोंबिवली पूर्व येथील आयरे गावात ‘राघो हाईट्स’ ही बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. बिल्डरने या इमारतीतील घरे स्वस्तात विकली आणि स्वतःची तुंबडी भरून तो नामानिराळा राहिला आहे. उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर राघो हाईट्सवरही त्याचा फेरा आला आहे. उज्ज्वला पाटील या महिलेने बेकायदा बांधकाम म्हणून या इमारतीविरोधात सातत्याने तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आज प्रभारी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे पथक जेसीबी व अन्य यंत्रणा घेऊन राघो हाईट्स येथे दाखल झाले.
पोरं-बाळं, म्हातारे-कोतारे रस्त्यावर येतील पालिकेचे पथक कारवाईसाठी येणार याची आधीच कुणकुण लागलेल्या रहिवाशांनी इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यात महिलाचा मोठा सहभाग होता. आज धो धो पावसात ही इमारत पाडली जाणार होती. मात्र पालिका अधिकारी आणि इमारत पाडण्याच्या यंत्रणेला पाहताच महिलांच्या अश्रूचा बांध फुटला. ऐन पावसात आम्हाला बेघर करू नका हो.. आमची मुले-बाळे, म्हातारे-कोतारे रस्त्यावर येतील, आमचे संसार उद्ध्वस्त होतील, ऐन पावसाळ्यात आम्ही कुठे जायचे?, मुलांच्या शाळा सुरू होतील, आमच्या लेकरा-बाळांचे छप्पर हिरावून घेऊ नका हो, असा टाहो रहिवासी महिलांनी फोडला. त्यांच्या तीव्र विरोधामुळे पालिकेचे पथक कारवाई न करता मागे फिरले.