
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील वाढत्या तणावाबाबात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राघुराम राजन यांनी परखड मत व्यक्त केले आहे. सध्याची परिस्थिती पाहाता रिझर्व्ह बँकेने राहुल द्रविडसारखे गंभीरतेने आणि अचूक निर्णय घेण्याची भूमिका बजावावी. नवज्योतसिंग सिद्धूसारखी धरसोड आणि बोलघेवडेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला राजन यांनी दिला आहे. सध्याच्या आर्थिक संकटातून आणि केंद्र सरकारशी असलेल्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घेणे महत्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँक ही केंद्र सरकारसाठी सिटबेल्टसारखी आहे. दुर्घटना रोखण्यासाठी सिटबेल्ट महत्वाचा असतो. मात्र, त्याचा वापर करावा किंवा नाही याचा निर्णय सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेचे अधिकार मर्यादीत करण्यासाठी सेक्शन 7 चा वापर करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. सरकारने सेक्शन 7 चा वापर केला तर सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील संबंध आणखी बिघडतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने परस्परांचा सन्मान करत काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. रिझर्व्ह बँक सरकारी यंत्रणा असली तिच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकार देशाच्या विकासाबाबत निर्णय घेते. तर रिझर्व्ह बँक आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न करते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या अधिकारात आणि कार्यकक्षेत हस्तक्षेप न करता काम करण्याची गरज आहे. सरकार रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांचा मान ठेवत सेक्शन 7 चा वापर करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारचे निर्णय रिझर्व्ह बँकेवर बंधनकारक नाही. रिझर्व्ह बँक सरकारला नकार देऊ शकते. देशाच्या आर्थिक स्थिरतेची जबाबदारी बँकेची आहे. त्यामुळे देशहितासाठी बँकेने ठाम भूमिका घेणे गरजेचे असल्याचे राजन यांनी सांगितले. बँकेच्या लाभांशावर सरकारचा कोणताही अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात ढासळणाऱ्या रुपयाच्या अवमूल्यनाबाबतही राजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रुपयाचे मूल्य काय असावे, याबाबत नेमकेपणाने सांगता येणार नाही. मात्र, रुपयाच्या मूल्यापेक्षा रुपयाला योग्य स्तरावर आणि स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एनपीए आणि फसवणूकीसारख्या घटना रोखण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरजही त्यांनी व्यक्त केली.

























































