आरबीआय हा सरकारचा सीट बेल्ट, नाही लावला तर अपघात होणारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. या वादात बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता उडी घेतली आहे. आरबीआयची भूमिका ही सध्या कारच्या सीट बेल्टप्रमाणे असून आरबीआय हा सध्या सरकारचा सीट बेल्ट आहे. लावणे किंवा न लावणे ही सर्वस्वी सरकारची मर्जी आहे, परंतु सीट बेल्ट लावला तर अपघात होणार नाही. तसेच दुर्घटना रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी आरबीआयची आहे, असे राजन यांनी म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीत आरबीआयने नवज्योतसिंग सिद्धूसारखी पोपटपंची न करता राहुल द्रविडसारखे अत्यंत जबाबदारीने निर्णय घ्यायला हवेत, असेही राजन यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले राजन

  • खरे तर फोकस रुपयाच्या मूल्यावर नाही तर रुपयाचे अवमूल्यन होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांवर असावा.
  • आरबीआय ही सरकारची संस्था आहे याच्याशी सहमत आहे, पण बोलणी सन्मानाच्या आधारावर होतात. दोघांनीही एकमेकांच्या अधिकारक्षेत्राचा आदर करायला हवा. दोघांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केली तर अडचणी उभ्या राहणारच.
  • आरबीआयकडे नाही बोलण्याचा अधिकार आहे. कारण स्थिरता कायम ठेवण्यासाठी आरबीआयच जबाबदार असते. खरे तर हे राजनैतिक किंवा स्वार्थ साधण्याचे ठिकाण नाही. केंद्र आणि आरबीआयला एकमेकांचा विचार करायला हवा, असेही राजन म्हणाले.

पटेल यांना जाण्यास सरकार सांगणार नाही
गर्व्हनर उर्जित पटेल यांना राजीनामा देऊन कार्यकाळ संपण्यापूर्वीच पद सोडावे असे सरकार सांगणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2019 ला संपत आहे. पण पटेल यांच्याशी मतभेद असले तरी त्यांनी पद सोडावे अशी सरकारची भूमिका नसल्याचे वृत्त आहे.