नरेंद्र ‘सरेंडर’ मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका करत हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आज राहुल गांधी यांनी संसदेत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यानंतर X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत. हा केवळ हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार नसून आपल्या अन्नदात्यांच्या उपजीविकेवर केलेला थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, आज हिंदुस्तानचा शेतकरी महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि किमान आधारभूत किमतीच्या (MSP) अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वतयारी नसताना हिंदुस्थानी शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी आणि आधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असलेल्या विदेशी पिकांच्या स्पर्धेत उतरवले जात आहे. ही लढाई बरोबरीची नसून शेतकऱ्यांवर असलेला एकतर्फी दबाव आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरकारची पोकळ आश्वासने आता चालणार नाहीत आणि शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या भविष्याचा सौदा केला जाऊ शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काहीही झाले तरी काँग्रेस पक्ष आणि स्वतः आपण वैयक्तिकरीत्या अन्नदात्यांच्या हक्क, सुरक्षा आणि सन्मानासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले.