पंतप्रधान मोदी कितीवेळा माफी मागणार? राहुल गांधी यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी शेतकऱयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकसभेत दोन मिनिटे बोलताना त्यांनी ‘पंतप्रधानांनी जी माफी मागितली आहे…’ असा तीनवेळा उल्लेख करीत ‘पंतप्रधान किती वेळा  माफी मागणार’ असा अप्रत्यक्ष शब्दबाण सरकारवर सोडला. तसेच फक्त माफी मागून काम चालणार नाही, असा टोलाही मोदींना लगावला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. काँग्रेस विविध मार्गांने टीकास्त्र सोडत आहे. याचदरम्यान मंगळवारी राहुल यांनी शेतकऱयांच्या प्रश्नांवरून सरकारला टार्गेट केले. आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शेतकऱयांच्या  कुटुंबीयांना भरपाई व नोकरीच्या मागणीचा मुद्दा त्यांनी मांडला. भाषणाच्या सुरुवातीला मोदींच्याच शब्दांचा वापर करून सरकारवर हल्ला चढवला. देशाला ठाऊक आहे,  शेतकरी आंदोलनात जवळपास 700 शेतकरी शहीद झाले आहेत. पंतप्रधानांनी देश आणि देशातील शेतकऱयांची माफी मागितली. त्यांची चूक झाली हे त्यांनी मान्य केले आहे, असे राहुल म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी जी माफी मागितली आहे, जे आपले सरकार म्हणतेय की कुठलाही शेतकरी शहीद झालेला नाही व त्यांची नावे आपल्याजवळ नाहीत. ती नावे आमच्याजवळ आहेत. पंतप्रधानांनी जी माफी मागितली आहे. शेतकऱयांचा हक्क पूर्णपणे मिळाला पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई व रोजगार मिळाला पाहिजे, अशा शब्दांत शेतकऱयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधत राहुल यांनी मोदी सरकारवर टोलेबाजी सुरू ठेवली.

शहीद शेतकऱयांच्या नावांची यादी दाखवली

राहुल यांनी कृषी कायद्यांविरोधी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शेतकऱयांच्या नावांची यादीदेखील लोकसभेत दाखवली. 30 नोव्हेंबरला कृषिमंत्र्यांनी आंदोलनादरम्यान किती शेतकरी शहीद झाले, या प्रश्नावर आपल्याकडे यासंदर्भात कुठलाही डाटा नसल्याचे सांगितले होते. आता आम्ही ती माहिती शोधून काढली आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी शहीद शेतकऱयांची यादीच सादर केली.