
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजस्थानातील अलवर येथे गायींची तस्करी करत असल्याच्या संशयातून जमावाने अकबर खान याची केलेली हत्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘क्रूर न्यू इंडिया’ आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदी यांच्यावर तोफ डागली. मोदी यांच्या ‘क्रूर न्यू इंडिया’मध्ये माणुसकीची जागा द्वेषाने पटकावली आहे, असेही ते म्हणाले.
जमावाने अमानुष मारहाण केलेला अकबर खान याला दाखल करण्यात आलेले रुग्णालय अवघे सहा किलोमीटर अंतरावर होते. पण खान याचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यासाठी तिथे पोहाचायला पोलिसांना तीन तास लागले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. पोलिसांनी तत्परतेने रुग्णालयात धाव घेण्याऐवजी मध्येच थांबून चहापान घेत वेळ घालवला,असा गौप्यस्फोट राहुल यांनी ट्विटरवरून केला आहे.
अकबर खान याला रुग्णालयात हलवण्याआधी स्थानिक पोलिसांनी खान आणि अस्लम यांच्याकडील दोन गाईंना सुरक्षित ठिकाणी नेले, असे वृत्तपत्रांतील बातम्यांचा हवाला देऊन त्यांनी नमूद केले.





























































