
लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे राहुल गांधी राजकारणापासून काहीसे दूर गेले होते. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबरला वर्धा येथे होणाऱ्या पदयात्रेत ते सहभागी होणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने संपूर्ण देशभर पदयात्रांचे आयोजन केले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या दिल्लीत होणाऱ्या पदयात्रेत, तर राहुल गांधी हे महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मुकुल कासनिक, सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
वर्धा येथील ही पदयात्रा सकाळी 10 वाजता बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरू होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर येथे समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.




























































