आपण जिंकलो असतो पण पनौतीमुळे हरलो! राहुल गांधी यांच्या विधानाने भाजपची चिडचिड

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा पराभव झाला. त्यामुळे देशातील 140 कोटी जनता हळहळली. त्यावरून सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया उमटत असताना व ‘पनौती’ हा शब्द ट्रेंड झाला असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाच शब्द पकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आपण विश्वचषक जिंकलो असतो पण पनौतीमुळे हरलो, असे राहुल म्हणाले. हे विधान भाजपला चांगलेच झोंबले आहे.

राहुल गांधी यांनी आज राजस्थानातील जालौर येथील सभेत बोलताना मोदींवर निशाणा साधला. ‘पीएम म्हणजे पनौती मोदी… ते क्रिकेट सामना पाहायला गेले आणि आपण पराभूत झालो. आपले खेळाडू चांगले खेळत होते. ते निश्चितच जिंकले असते पण पनौतीमुळे आपण हरलो,’ असे विधान राहुल गांधी यांनी केले. टीव्हीवाले हे सगळं सांगणार नाहीत मात्र जनतेला नेमपं काय घडलं ते ठाऊक आहे, असेही राहुल पुढे म्हणाले. राहुल यांच्या या विधानाला गर्दीतूनही जोरदार प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, राहुल गांधी यांची टीका भाजपला झोंबली. त्यावरून भाजप नेत्यांनी चिडचिड केली. पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरणे योग्य नाही. मोदींनी खेळाडूंना भेटून त्यांचे मनोबल उंचावले. हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग असतो. त्यामुळे राहुल यांनी मोदींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली.