
इराण युद्धावर बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केले जात आहे. त्यांनी शरणागती पत्करली आहे. त्यामुळेच ते संसदेतून पळून गेले आहेत. ते आता संसदेत येऊ शकणार नाहीत,’ अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली.
‘पश्चिम आशियाचा मुद्दा क्षुल्लक नाही. तेथील संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. इंधनाचे भाव वाढले आहेत. शेअर बाजारात ते आधीच दिसले आहे. मोदींनी आधीच अमेरिकेशी करार केला आहे. हे सगळे प्रश्न जनतेशी निगडित आहेत, महत्त्वाचे आहेत. त्यावर चर्चा करायला अडचण काय आहे? मात्र सरकारला त्यावर चर्चा नको आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील. पंतप्रधानांची बोटचेपी भूमिका देशाला कळेल. म्हणून सरकारला चर्चा नको आहे. पंतप्रधान पळून गेले आहेत,’ असा टोला राहुल यांनी हाणला.




























































