चीनच्या लडाखमधील घुसखोरीवर पंतप्रधान खोटे का बोलत आहेत? राहुल गांधी यांचा थेट हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 4 ऑगस्ट रोजी काही दस्तऐवज आपल्या वेबसाईटवर टाकून मे महिन्यातच चीनने लडाखमध्ये घुसखोरी केल्याची जाहीर कबुली दिली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी घुसखोरी झालीच नाही असे छातीठोकपणे सांगतात. चीनच्या घुसखोरीकर पंतप्रधान देशाला खोटे का बोलत आहेत, असा थेट हल्ला काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चीनचा मुकाबला करण्याची हिंमतच नाही. संरक्षण मंत्रालयाने मेमध्येच घुसखोरी झाल्याची कबुली दिली आहे. मग घुसखोरी झालीच नाही असे पंतप्रधान कसे म्हणू शकतात?’  केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 4 ऑगस्ट रोजी लडाखमधील घुसखोरीची कबुली देणारे दस्तऐवज आपल्या वेबसाईटवर टाकले. ही कागदपत्रे समोर येताच देशभरात खळबळ उडाली. चीनने मे महिन्यातच गलवान खोरे, पॅगाँग तलावा, गोगरा, हॉट प्रिंग या भागात घुसखोरी केली. 17 आणि 18 मे रोजी चिनी लष्कर हिंदुस्थानी भूभागात घुसले असा स्पष्ट उल्लेख या दस्तऐवजात आहे, असे राहुल गांधी  म्हणाले.

वेबसाईटवरून कागदपत्रे गायब

राहुल गांधी यांनी हल्लाबोल करताच संरक्षण मंत्रालयाने ही कागदपत्रे वेबसाईटवरून गायब केली. अवघ्या 48 तासांत ही लपवाछपवी करण्याची नामुष्की संरक्षण मंत्रालयावर आली. मात्र कागदपत्रे लपवल्याने का गायब केल्याने तथ्य थोडीच बदलणार आहे असा सवाल राहुल गांधी यांनी केला.