निवडणूक आयोगाची चोरी आम्ही पकडलीय, आमच्याकडे मतदार याद्यातील हेराफेरीचे ठोस पुरावे! – राहुल गांधी

निवडणूक आयोग आपले काम योग्यरित्या करत नाही, असे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला. निवडणूक आयोगाविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. बिहारमधील मतदार यादी फेर पडताळणीच्या मुद्द्यावर संसद भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने कोणत्याही गैरसमजात राहू नये. मतदार याद्यांतील हेराफेरीचे 100 टक्के ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. ही केवळ एका मतदारसंघातील बाब नसून अनेक मतदारसंघामध्ये हेच घडत आहे. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचे प्रकार घडले. प्रत्येक मतदारसंघात 45, 50, 60 वयोगटातील नवीन मतदार घुसवले गेले. हे प्रकरण गंभीर असून आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.

निवडणूक आयोगाची चोरी आम्ही पकडली आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहू. कर्नाटकात एका जागी त्यांनी चोरी होऊ दिली. याबाबत आज त्यांनी दिलेले स्टेटमेंट मूर्खपणाचे आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. तसेच लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

दरम्यान, मतदार वाढवून आणि कमी करून निवडणूक कशी चोरली जाते याची सगळी माहिती आम्ही काढली आहे. कर्नाटकात आम्ही निवडणूक आयोगाची ही चोरी पकडली आहे. त्यासाठी तब्बल सहा महिने आमच्या कार्यकर्त्यांनी रिसर्च केला, असा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी बुधवारी केला होता.

मतदार याद्यांच्या हेराफेरीचा पर्दाफाश, हिंदुस्थानात निवडणूक चोरली जाते हेच सत्य आहे – राहुल गांधी

दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या फेरतपासणीला विरोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली. संदेच्या मकर द्वाराजवळ सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.