निवडणूक आयोगातील माणसंच आम्हाला माहिती देत आहेत; मतचोरी मुद्द्यावर राहुल गांधींचा मोठा दावा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. निवडणूक आयोग मतदार यादीतून लोकांची नावे वगळत आहे आणि त्यासाठी बनावट मोबाईल नंबर वापरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.निवडणूक आयोगातील माणसंच आम्हाला माहिती देत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

कर्नाटक सीआयडीने निवडणूक प्रकियेबाबत विचारलेल्या प्रश्नांना आठवड्याभरात उत्तरे द्या, अन्यथा जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला एका आठवड्याचा अल्टीमेटम दिला आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतचोरीचा मुद्द्यावर निवडणूक आयोगाची पोलखोल केली. निवडणूक आयोग सर्वसामान्य लोकांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळत आहे. यासाठी ते इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरत आहेत. आता निवडणूक आयोगातील अनेक लोक त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यांच्याकडून मदत मिळत आहे. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयोगातील अनेक लोक माझ्याकडे येत आहेत. आता ही संख्या वाढतच आहे. आतील सर्व माहिती आता बाहेर येत आहे. पूर्वी, आपल्याला कोणतीही मदत मिळाली नव्हती, परंतु आता मला मदत मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.

देशातील तरुणांना मतदान चोरी होत आहे, हे समजले तर ते कोणत्याही परिस्थितीत व्होटचोरी सहन करणार नाहीत. व्होटचोरी आपण सर्व काही पुराव्यांसह उघड करणार आहोत. त्याची पायभरणी आपण करत आहोत. देशाची लोकशाही हायजॅक झाली आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त दोघांनाही एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला. ते म्हणाले, कर्नाटक सीआयडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एका आठवड्यात द्या. जर असे केले नाही तर जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल. निवडणूक आयुक्तांना या सर्व मत चोरीची माहिती आहे. त्यांना सर्व काही माहित आहे. यानंतरही, ते अशा लोकांना मदत करत आहेत जे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.