
शेतकऱयांचे प्रश्न, पेगॅसस प्रकरण, महागाई अशा विविध मुद्दय़ांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र जमवून रणनीती आखणारे काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमवारी, 9 ऑगस्टला श्रीनगरला जाणार आहेत. वादग्रस्त कलम 370 हटवले गेल्यानंतर ते पहिल्यांदा जम्मू-कश्मीरच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयात ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुंषगाने काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची शक्यता आहे.
राहुल यांचा जम्मू-कश्मीर दौरा विविध अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ते सोमवारी श्रीनगरमध्ये दाखल होऊन दोन दिवस स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक आढावा घेतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. मोदी सरकारने 2019 मध्ये जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्दबातल ठरवले होते. सरकारच्या त्या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्षे उलटत असतानाच राहुल गांधी श्रीनगरला जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱयाला राजकीयदृष्टय़ा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदी सरकारने कलम 370 रद्द करून संविधानाचे उल्लंघन केल्याची जोरदार टीका राहुल गांधींनी त्यावेळी केली होती. त्यामुळे त्यांचा हा दौरा लक्षवेधी ठरणार आहे.
दिल्लीतील अत्याचारपीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट
दिल्लीत नराधमांच्या सामूहिक अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या नऊ वर्षांच्या पीडित मुलीच्या आईवडिलांची राहुल गांधींनी बुधवारी भेट घेतली. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचे व कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी पीडितेच्या पालकांना दिले. त्यांनी या भेटीचे छायाचित्र ट्विट केले आहे. पीडित मुलगी न्यायाची हक्कदार असल्याचे या ट्विटमध्ये लिहिले आहे.



























































