कश्मीर दौऱ्यावर निघालेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरून परत पाठवले

3294
rahul-gandhi

जम्मू- कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेल्या  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व सर्व विरोधी नेत्यांना दिल्लीला परत पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना विमानतळाबाहेर जाण्यास मच्चाव केल्याने श्रीनगर विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

जम्मू कश्मीरमधली परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. इथे दहशतवाद्यांसह फुटीरतावादी आणि उपद्रवी व्यक्ती तणाव निर्माण करण्याची संधी शोधत आहेत. त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरवत कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. राजकारण्यांनी इथे येऊन या प्रक्रियेत अडथळा आणू नये असं प्रशासनाने सांगितले आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भाकपचे सरचिटणीस डी.राजा,राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा हे नेते देखील श्रीनगरला निघाले आहेत. यातील आझाद यांनी यापूर्वी दोनवेळा कश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना दोन्ही वेळा विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं होतं. जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना कश्मीरमध्ये येण्याचे आणि परिस्थिती पाहण्याचे आवाहन केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी हा दौरा ठरवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या