पंतप्रधान मोदी म्हणजे मीडियाने फुगवलेला फुगा, राहुल गांधी यांची सडकून टीका

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदी म्हणजे मीडियाने फुगवलेला फुगा आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसमच्या एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी हे फक्त दिखावा आहेत, त्यांना जास्त महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्यक्षात असे काहीही नाही. राहुल गांधींनी असाही दावा केला की, पंतप्रधान मोदींना दोन-तीन वेळा भेटल्यानंतर आणि त्यांच्यासोबत एकाच खोलीत बसल्यानंतर त्यांना समजले की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी कधीही मोठी समस्या नव्हते.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘माझा वैयक्तिक अनुभव आहे की, त्यांच्यात (पंतप्रधान मोदींमध्ये) हिंमत नाही.” हिंदुस्थानातील सरकारी नोकऱ्यांमध्ये वंचित आणि उपेक्षित समुदायांचे कमी प्रतिनिधित्व असल्याबद्दलही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 90 टक्के लोक दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर हलवा वाटला जात होता, तेव्हा या 90 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नव्हते. ही 90 टक्के लोकसंख्या ही देशाची उत्पादक शक्ती आहे.”