
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
राफेल सौद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकेचा मारा दिवसेंदिवस तिखट करायला सुरुवात केली आहे. राफेल सौद्याचा निर्णय तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला नव्हता, हा निर्णय एकट्या ‘बॉस’ने घेतला होता असं म्हणत राहुल यांनी मोदींवर नव्याने हल्ला चढवलाय. सध्या याच सौद्यामुळे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना रात्री झोप लागत नसल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की या सौद्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांची भागीदारी आहे. या सौद्यासाठी अनिल अंबानी यांना दसॉल्ट कंपनीकडून कोट्यवधींचा फायदा झाला असल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. अनिल अंबानी यांची कंपनी तोट्यात आहे. अशा तोट्यात असलेल्या आठ लाखांच्या कंपनीत दसॉल्ट कंपनीने २८४ कोटी रुपयांची गुंतकवणूक केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दसॉल्ट कंपनीने अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देताना सांगितलं होतं की त्यांच्याकडे जमीन असल्याने त्यांना कंत्राट देण्यात आलं आहे. मात्र दसॉल्ट कंपनीने दिलेल्या २८ कोटी रुपयांमुळे अनिल अंबानींच्या कंपनीने जागा खरेदी केल्याचा नवा दावा राहुल गांधींनी केला आहे.
राफेल विमानांच्या किंमतीबाबत केंद्र सरकारने गुप्ततेच्या धोरणामुळे त्या सांगता येणार नाही असं म्हटलंय, मात्र किंमती सार्वजनिक करू नयेत असं फ्रान्स आणि हिंदुस्थानदरम्यान झालेल्या गुप्तता करारात कुठेही नमूद नाही असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने किंमती लपवून ठेवता येऊच शकत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. दसॉल्टच्या वार्षिक अहवालामध्ये राफेल विमानांच्या किंमतींचा उल्लेख असल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.


























































