मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजय आमचाच! राहुल गांधी यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजय आमचाच होईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची, तर मध्यप्रदेशात भाजप आणि तेलंगणात भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई होणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकणारच आहोत. राजस्थानमध्ये आम्ही विजयाच्या जवळ आहोत. तेथे अटीतटीची लढाई होणार असून काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास आम्हाला आहे. आमच्या विजयाची भाजपच्या गोटातही चर्चा आहे. आम्हाला विजय मिळत असल्याचे स्पष्ट असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ते म्हणाले.

जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. जातनिहाय जनगणना ही देशातील जनतेला हवी असणारी मूलभूत गोष्ट आहे, हे भाजपला माहिती आहे. म्हणून त्यावर भाजपला चर्चा करायची नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.