मणिपूरच्या दोन घटना कधीच विसरणार नाही, राहुल गांधी यांनी दिला दौऱ्यातील कटू आठवणींनी उजाळा

 मणिपूर दौऱयावर असताना मी ज्या दोन घटना पाहिल्या त्या कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱयातील आपल्या कटू आठवणींना उजाळा दिला. रद्द करण्यात आलेली खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर राहुल प्रथमच केरळच्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱयावर आहेत. दोनदिवसीय दौऱयातील त्यांचा आजचा पहिला दिवस होता.

राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघात पोहोचले असून त्यांनी कलपेट्टा येथे एका रॅलीला संबोधित केले. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. तेथे जे पाहिले ते कुठेच पाहिले नाही. पूर आला असेल, हिंसाचार झाला असेल. पण जे मणिपुरात पाहिले ते कुठेच दिसले नाही. तुम्ही माझे कुटुंब आहात. तुम्हाला हे सांगायला हवे. ज्या लोकांसोबत मी बोललो ते खूपच भयानक होते, असे राहुल म्हणाले.

मणिपूरमध्ये दोन घटना पाहिल्या. पहिल्या घटनेत एका महिलेच्या मुलाला तिच्या डोळय़ासमोर गोळय़ा घालून मारले. तुम्ही फक्त कल्पना करा की, तुमच्या डोळय़समोर तुमच्या मुलाला मारले जात आहे. त्या महिलेचे घर जाळले. तर दुसरी घटनेत मी ज्या महिलेशी बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. कारण तिच्या आई आणि बहिणीसोबत जे घडले ते आठवताच तिची शुद्ध हरपली. हे मणिपुरातील वास्तव आहे.