
सामना ऑनलाईन । रायबरेली
मोदी सरकारने अमेठी आणि रायबरेलीसाठी काहीही दिले तर नाहीच उलट होते तेही ओरबाडून घेतले. आता भाजपवाले इथे आले तर त्यांना सांगा की तुम्हाला लबाड पंतप्रधानाची लाज वाटली पाहिजे, असा हल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेली येथील जाहीर सभेत चढवला.
पंतप्रधान आधी देवाचे नाव घेतात, मग खोटे बोलतात असे सांगून ते म्हणाले की, अमेठीतला ‘फूड पार्क’ मोदी यांनी रोखला. रायबरेलीतला महामार्ग बनवला नाही? विकासाचे अनेक प्रकल्प रोखले. ना तरुणांना नोकऱ्या दिल्या ना जनतेला 15 लाख रुपये दिले. अशा पंतप्रधानांची भाजपला लाज वाटली पाहिजे. रायबरेलीप्रमाणेच राहुल गांधी यांनी आपल्या अमेठी मतदारसंघातही चौकसभा घेतली.
लोकसभेची निवडणूक काँग्रेस सारी शक्ती पणाला लावून लढेल असे सांगतानाच उत्तर प्रदेशातील पुढील सरकार काँग्रेसचे हेसुद्धा आमचे लक्ष्य असून प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना त्याच मोहिमेवर त्या राज्यात धाडण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मी स्वतः, माझी आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका हे मतदारसंघांतील जनतेचे सैनिक आहोत असे ते म्हणाले. या सभेत राहुल गांधी यांनी चौकीदारच चोर निघाला आहे असे सांगतानाच ‘गली गली में शोर है, चौकीदार चोर है’ अशा घोषणाही दिल्या.
हटवणार म्हणजे हटवणारच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे द्वेषाचा पुतळा असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना हटवणार म्हणजे हटवणारच. भाजपची केंद्रातून गच्छंति आता कोणीही रोखू शकणार नाही असे सांगून ते म्हणाले की, मोदींच्या भाजपने गुजरातमधून यूपी, बिहारच्या लोकांना हाकलून लावले. हिंदू आणि मुसलमानांना ते आपापसात लढवत आहेत.

























































