पंतप्रधान मोदी भ्याड, चीनचा सामना केला नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्याड आहेत. त्यांनी चीनचा सामना केला नाही. हिंदुस्थानचा भूभाग मोदींनी चीनला सोपविला. हिंदुस्थानच्या भूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, असा गंभीर आरोप करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.

सामंजस्य करारानुसार पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदुस्थानने एक इंचही जमीन गमावलेली नाही असे निवेदन गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले होते. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र्ा सोडले. चीनच्या घुसखोरीच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनी निवेदन करायला हवे होते. ‘एलएसी’वर काय स्थिती आहे हे देशाला सांगायला हवे होते. पण मोदी का बोलले नाहीत? पंतप्रधानांनी देशाला सत्य सांगायला हवे की हिंदुस्थानचा भूभाग चीनला सोपविला आहे. संरक्षणमंत्र्यांनी केलेले निवेदन अतिशय मिळमिळीत होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

– हा तर लष्कराचा विश्वासघात

हिंदुस्थानी जवानांनी कैलास पर्वतरांगेपर्यंत ताबा मिळविला होता. पण पंतप्रधान मोदींनी हा भूभाग चीनला सोपविला. पंतप्रधान एवढं कोणाला घाबरतात? पंतप्रधान शंभर टक्के भित्रे आणि भ्याड आहेत. त्यांनी चीनचा सामना केला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.