जानते हो मैं झुठ नहीं बोलता! सरकार येऊ द्या तिन्ही आयुक्तांना बघतोच! राहुल यांचा इशारा

‘मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतोच. मी कधी खोटं बोलत नाही हे तुम्हाला माहीत आहे. निवडणूक कार्यालयात बसलेल्या तिन्ही आयुक्तांना मी सांगून ठेवतो. आता मोदींचे सरकार आहे, पण ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ. तुमच्यावर कारवाई केली जाईल’, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला गया येथे जनसमुदायाला संबोधित करताना राहुल यांनी सध्याच्या निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. ‘निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सध्या जे तीन आयुक्त बसलेत, ते भाजपचे सदस्य आहेत. ते मोदी सरकारसाठी काम करतात. नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग जेव्हा मतांची चोरी करतात, तेव्हा तो संविधानावर व भारतमातेवर हल्ला असतो. आम्ही हे हल्ले आता होऊ देणार नाही. देशातील प्रत्येक राज्यात, विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील चोरी पकडून आम्ही देशासमोर ठेवणार आहोत, असे राहुल म्हणाले.

मतचोरीचे आरोप प्रतिज्ञापत्र देऊन करा, असे सांगणाऱया आयोगाला राहुल यांनी सुनावले. ‘जबाबदारी त्यांची आहे. चोरी त्यांची पकडली गेली आहे आणि प्रतिज्ञापत्र माझ्याकडे मागत आहेत. थोडे दिवस थांबा, संपूर्ण देश तुमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागेल’, असे राहुल यांनी ठणकावले.