काँग्रेस अध्यक्षपद नको म्हणजे नकोच! राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपद नको म्हणजे नकोच अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा मांडली.

काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत काँग्रेस खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याबाबत विनंती केली. काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत खासदारांनी मांडले, मात्र लोकसभा निकडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्कीकारत अध्यक्षपदावर न राहण्याच्या निर्णयाचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांच्या या निर्णयाबद्दल बहुतांश खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

 

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे

युकक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला, परंतु राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.  त्यामुळे काँग्रेसचा नका अध्यक्ष कोण असणार आणि कधीपर्यंत नव्या अध्यक्षांची निकड जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  

32 दिवसांनंतरही अध्यक्षपदाचा तिढा कायम

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी 25 मे रोजी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीकडे सोपविला होता त्यास 32 दिवस उलटले तरी अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा असली तरी तूर्तास पक्षात अशी कुठलीही हालचाल नाही. तसेच नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीत माझी कोणतीही भूमिका नसेल असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.