‘सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या ज्या विचारधारेविरोधात ते लढले, त्याच विचारधारेने राज्याभिषेकाला विरोध केला होता, असा हल्लाबोल काँग्रेसनेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितले ते 21व्या शतकात आपल्या संविधानात दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजेच संविधान आहे. मात्र, सध्या संविधान बदलण्याची विचारधारा बळावत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेसह संविधानाचे आपल्याला रक्षण करायचे आहे,’ असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
कसबा बावडा येथे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, तसेच ‘डी. वाय. पाटील ग्रुप’चे संजय पाटील यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुशस्त्रधारी एकमेवाद्वितीय अशा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सकाळी राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, माणिकराव ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करीत आहोत. पण पुतळा असाच उभारला जात नाही. आपण एखादी व्यक्ती, त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो, तेव्हाच तो उभारला जातो. आम्ही पुतळ्याचे अनावरण केले असले, तरी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जेव्हा आपण छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करतो, तेव्हा एक वचनही घेतो, ज्याच्यासाठी ते लढले, त्यासाठी त्यांच्याइतके नाही, पण थोडेतरी आपणही काहीतरी करायला हवे. जर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखे महापुरुष नसते तर आज संविधान नसते.
‘हिंदुस्थानात आज दोन विचारधारांची लढाई आहे. एक विचारधारा संविधानाचे रक्षण करते. समानता आणि एकतेची गोष्ट करते. ती छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे. तर, दुसरी विचारधारा संविधान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ते सकाळी उठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे संविधान संपविण्याचा विचार सतत करतात. लोकांना धमकावतात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकतात. पण याला काही अर्थ नाही.
जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतो, तर आपल्याला संविधानाचे रक्षण करावेच लागेल. ही विचारधारा हजारो वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातही याचविरोधात लढाई सुरू होती. याच विचारधारेने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केला होता. ही नवीन गोष्ट नाही. ही हजारो वर्षे जुनी लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले होते, त्याच विचारधारेविरोधात आजही काँग्रेस लढत असून, शिव-शाहूंची विचारधारा मानणाऱ्यांनाही यासाठी लढावे लागणार आहे,’ असे आवाहन खासदार राहुल गांधी यांनी केले.
शिवरायांची ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीतूनच!
‘छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा ही देशाच्या संविधानात आहे. छत्रपती शिवरायांना ही विचारधारा या महाराष्ट्राच्या मातीने दिली आहे. येथील जनतेने दिली आहे. ते तुमच्या रक्तात आहे. आपण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा तुमच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर, तुमच्या विचारांत, तुमच्या आयुष्यात दरदिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची विचारधारा दिसते. त्यासाठी तुम्ही लढता,’ असेही राहुल गांधी म्हणाले.
नियत चुकीची म्हणून छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला
मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळला. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपचा बुरखाच फाडला. ‘नियत कधी लपू शकत नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला; पण काही महिन्यांतच तो कोसळला. त्यांची नियत चुकीची होती. पुतळ्याने ते संकेत दिले. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल, तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचे रक्षण करावे लागेल. पण त्यांची विचारधारा चुकीची असल्याने तो पुतळा कोसळला. ते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हात जोडतात आणि 24 तासांत महाराजांच्या विचारांविरोधात काम करतात. नवीन संसद, तसेच राम मंदिराच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना जाऊ दिले नाही. हीच त्यांची विचारधारा आहे,’ असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी भाजपवर केला.