
– महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तोंडावर आला असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार मलाच आहे’ अशी भूमिका आज मांडली. त्याला आधार म्हणून त्यांनी संविधानातील तरतुदींचे दाखलेही दिले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ‘माझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन’ असे वक्तव्य नाशिक येथे केले होते. त्यातच राहुल नार्वेकर हे 11 मे रोजी लंडन दौऱयावर निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी नार्वेकर यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न आज केला.
लंडन दौरा पूर्वनियोजित
आपला लंडन दौरा पूर्वनियोजित असून त्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबध नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असते तेव्हा संविधानातील नियमानुसार अध्यक्षांचे अधिकार उपाध्यक्षांकडे जातात आणि अध्यक्षांनी चार्ज घेतला की उपाध्यक्षांकडील अध्यक्षांचे अधिकार संपुष्टात येतात, असे ते म्हणाले.
अध्यक्षांचे अधिकार कुणीही काढून घेऊ शकत नाही
राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘देशातील कायदे हे पुढच्या काळासाठी लागू असतात. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्षच करू शकतात. इतर कोणतीही संस्था तो अधिकार काढून घेऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या निलंबनाबाबतच्या सर्व याचिकांवर निर्णय देत नाहीत तोपर्यंत कोणतेही न्यायालय किंवा संवैधानिक संस्था हस्तक्षेप करणार नाही अशी आपल्याला खात्री आहे.’
संविधानाने नेमून दिलेलेच काम प्रत्येकाने करावे
‘सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळाचे प्रमुख, अध्यक्ष हे विधिमंडळाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. संविधानाने ज्या संस्थेला जे काम नेमून दिले आहे तिने ते काम करावे असे अपेक्षित असते,’ असेही नार्वेकर म्हणाले.




























































