बिबटय़ाच्या हल्ल्यात राहुरीत बालिकेचा मृत्यू

देव राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी कुटुंबातील चार वर्षांची वेदिका श्रीकांत ढगे ही अंगणात खेळत असताना, गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने वेदिकावर झडप मारली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदिकाचा उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे या शेतकरी कुटुंबातील मुलगी वेदिका सकाळी अंगणात खेळत होती. यावेळी घराशेजारील गवतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबटय़ाने धूम ठोकली. मात्र, बिबटय़ाच्या हल्ल्यात वेदिका गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठोंगे, वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक सतीश जाधव, गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वरवंडी भागात बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात वेदिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने वरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यातील कृषिविद्यापीठ, मुळानगर, बाभुळगाव, बारागाव नांदुर आदी भागांत मानवी वस्त्यांवर बिबटय़ांची वर्दळ वाढलेली आहे. शेजारील राहाता, श्रीरामपूर तालुक्यात मानवी वस्त्यांवर बिबटय़ांची वर्दळ वाढली असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.