विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व

विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंगची मर्यादा पाळून हे काम करण्यात आल्याने उपस्थित असलेल्या शेतक-यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत राहुरी वनविभागाच्या या कामगिरीचे स्वागत केले.

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील मच्छिंद्र रामभाऊ बाचकर यांच्या शेतीतील गटनंबर 96 मधील विहिरीत गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्षाच्या शोधात आलेला दीड वर्ष वयाचा नर बिबट्या बुधवारी रात्री या विहिरीत पडला होता. आज पहाटेच्या वेळात बिबट्याच्या आवाजाची चाहूल लागल्याने परिसरातील शेतक-यांनी माग काढला असता विहिरीत असलेल्या पाण्याच्या पाईपला धरून बसलेला बिबट्या दिसून आला. याबाबत पिंपळगाव फुणगी येथील निखील जगताप यांनी राहुरी वनविभागाला खबर दिल्याने सहाय्यक वनसंरक्षक आर. जी. देवखीळे, राहुरीचे वनक्षेत्रपाल एम. बी. पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी. एन. लोंढे, वनपाल सचिन गायकवाड, वनरक्षक समाधान चव्हाण, वन कर्मचारी लक्ष्मण किनकर यांनी बिबट्याला बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली.

वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोरखंडाला पिंजरा बांधुन विहीरीत सोडल्यानंतर दीड तासाच्या प्रयत्ना नंतर दीड वर्षाचा नरबिबट पिंज-यात जेरबंद झाला. राञभर पाण्यात असल्याने बिबट्याची अवस्था खराब झाल्याचे दिसुन आले. बिबट्याला सहीसलामत बाहेर काढण्यात आल्याने उपस्थित शेतक-यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत सुटकेचा सुस्कारा सोडला.