अतिरिक्त आयुक्तांची वेषांतर करून भल्या पहाटे केईएम, शीव, कूपर रुग्णालयावर धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधील घटनांनंतर आरोग्य यंत्रणेवर वचक ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तर वेषांतर करून आज भल्यापहाटे केईएम, शीव आणि कूपर रुग्णालयावर धाड घातली. रुग्णालयातील अनेक विभागांमध्ये फिरून त्यांनी तेथील कामांची पाहणी केली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना ते अतिरिक्त आयुक्त आहेत हे कळलेच नाही.

महापालिकेचे हे अतिरिक्त आयुक्त आहेत डॉ. सुधाकर शिंदे. आज मध्यरात्री अडीच वाजता ते केईएम रुग्णालयात पोहोचले. कुणी ओळखू नये म्हणून ते आपली गाडी रुग्णालयापासून थोडी दूर पार्क करून चालत रुग्णालयात पोहोचले. गेटवरील सुरक्षा रक्षक, अपघात विभाग, आपत्कालीन विभागात रुग्णालय कॅम्पसमध्ये त्यांनी चक्कर मारली.

केईएमच्या जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीपर्यंतचा परिसर आणि नंतर शवागारात पाहणी केल्यानंतर ते केईएममधून निघाले आणि शीव रुग्णालयात पोहोचले. तिथेही त्यांनी महत्त्वाचे म्हणजेच जिथे रुग्णांची सतत वर्दळ असते अशा विभागांची पाहणी केली. तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. नंतर कूपर रुग्णालयालाही त्यांनी सरप्राईज व्हिजिट दिली. यासंदर्भात डॉ. शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी आपली ही पहिलीच व्हिजिट नसून रोजच कुठल्या ना कुठल्या रुग्णालयात जाऊन आपण पाहणी करतो, असे त्यांनी सांगितले.