गोव्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; 9 लाखांच्या ड्रग्ससह 23 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटातही गोव्याच्या किनारी भागात आयोजित केल्या जात असलेल्या पार्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच उत्तर गोव्यातील वागातोर येथील फिरंगीपानी व्हिला येथे शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेली रेव्ह पार्टी क्राइम ब्रांचने उधळून लावत 9 लाखांच्या अंमली पदार्थांसह 23 जणांना अटक केली आहे.

देशभरात अनलॉक सुरु झाल्यापासून गोव्याच्या किनारी भागात गपचुप पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. स्थानिकांकडून याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. तसेच त्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलीस कारवाई करत नसल्याने हे होत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. उत्तर गोव्यात वागातोर येथे शनिवारी रात्री गपचुप रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. क्राइम ब्रांचला याची खबर मिळताच 3 पथके करून पार्टीवर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 9 लाख रूपयांचे कोकेन, एमडीएमए, एक्स्टासी गोळ्या, चरस आदी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी तीन परदेशी महिलांसह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थविरोधी कायदा आणि सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल परब, नारायण चिमुलकर, महिला पोलीस उपनिरीक्षक रीमा नाईक आणि संध्या गुप्ता यांच्या पथकाने ही कारवाई केली.