
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 14 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली. यामध्ये आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नाम साधर्म्य असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. तर 3 एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या अनंत पद्मा गीते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

गुरुवारी उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या 25 इतकी झाली आहे. 5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील श्याम तटकरे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी या अपक्ष सुनील तटकरेला उभा केल्याने त्याने 9849 मते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा यावेळी विरोधकांनी ही खेळी आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात खेळली असून यावेळी एक नव्हे तर दोन अपक्ष सुनील तटकरे उभे केले आहेत. त्यामुळे या नाम साधर्म्यमुळे सुनील तटकरे याच्या मतावर परिणाम होणार आहे. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार अनंत गीते याच्या नाम साधर्म्य असलेला अनंत गीते निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे.
रायगड जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. त्यामुळे यावेळीही ही खेळी राजकीय पक्षांनी एकमेकविरोधात खेळली आहे. त्यामुळे याचा फायदा व तोटा कुणाला होणार हे मतपेटीमधून कळणारच आहे.




























































