राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्याला मिळाला 50 कोटींचा वाढीव निधी

415

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घराच्या पडझडीसाठी, भांडी, कपडे, मच्छीमार यांना पूर्वीच्या निकषात बदल करून वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी 50 कोटीच्या निधीची वाढीव गरज होती. ही वाढीव मदत शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या खात्यात आता आठवड्याभरात वाढीव मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील दोन लाख घरांचे नुकसान झाले होते. चक्रीवादळ नंतर राज्य शासनाने त्वरित पावले उचलून पावणे चारशे कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले. यातील पावणे तीनशे कोटी रुपये हे घराच्या नुकसानीसाठी देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने घराच्या पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना 203 कोटींची नुकसान भरपाई वाटप केली आहे. राज्य शासनाच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने 50 कोटी वाढीव निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्ताचे रखडलेले नुकसान भरपाई निधी वाटप प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्ताचा वाढीव निधी दिल्याने नागरिकांच्या खात्यात आता भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाने जुन्या निकषात बदल करून वाढीव मदत नुकसानग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 50 कोटींच्या वाढीव निधीची गरज होती. याबाबत शासनाला कळविण्यात आले होते. शासनाने तातडीने 50 कोटी निधी प्रशासनाकडे वर्ग केला आहे. तहसीलदारामार्फत यादी तयार करून आठवड्याभरात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. – निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

आपली प्रतिक्रिया द्या