परदेशी पर्यटकांनी व्यापाऱ्याला घातला 35 हजारांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्याची पर्यटकांना भुरळ पडली असून राज्यातील, देशातील तसेच परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असताना परदेशी पाहुण्यांनीच या संस्कृतीचा अपमान करून जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रेपोली येथील व्यापाऱ्याला 35 हजारांचा गंडा घातला आहे. परदेशी पर्यटक चोरी करताना हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी पाहुण्याच्या या हातचलखीने आता अतिथी देवो भव संस्कृती जतन करताना फसले जाणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन परदेशी पर्यटक हे रविवारी दुपारी माणगाव तालुक्यातील रेपोली येथील भात खरेदी विक्री करणारे व्यापारी वासुदेव जांभरे यांच्या दुकानात आले होते. जांभरे यांचे मुंबई गोवा महामार्गावर दुकान आहे. परदेशी पर्यटकांनी जांभरे यांच्या दुकानात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर दोन हजार रुपयांचे सुट्टे पैसे मागितले. जांभरे यांनी सुट्टे पैसे त्यांना दिले. त्यावेळी या परदेशी पर्यटकांपैकी एकाने जांभरे यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचा फायदा घेऊन दुसऱ्या पर्यटकाने त्यांच्या गल्यातील 35 हजार रोकडवर डल्ला मारला आणि पसार झाले. थोड्यावेळाने गळ्यातील रोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच कपाळावर हात मारला.

जांभरे यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही बघितले असता दुकानात आलेले परदेशी पर्यटक हे पैसे चोरताना दिसले. ही बाब लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज घेऊन जांभरे यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात या चोरट्या परदेशी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. गोरेगाव पोलीस या चोरट्यांचा तपास करीत आहे. वर्षभरपूर्वीही अशीच घटना लोणारे येथे घडली होती.